पुणे –महापालिका कर्मचाऱ्यांच्या आधी पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम मिळणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्यात आलेली नसली तरी पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी 6 कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. तर, महापालिकेने गेल्याच महिन्यात पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. तो लागू झाल्याने पुढील पाच वर्षांत महापालिकेला अंदाजपत्रकात सुमारे 260 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
फेब्रुवारीचे वेतनही लटकले?
महापालिका कर्मचाऱ्यांना अजूनही वेतनातील फरक मिळालेला नाही. मुळातच वेतन आयोग देताना उशीर झाला होता. वेतन आयोग लागू झाल्यानंतर फरक देण्याचेदेखील सांगण्यात आले होते. मात्र, महापालिका कर्मचारी अजून त्याची वाट पाहत आहे. त्यावरून कामगार संघटनांकडून नारजी व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाकडून गेल्या दिवसापासून बिल पुस्तकेदेखील चेक केली जात होती. यामुळे मात्र कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचे वेतन 10 मार्च उजाडले तरी अद्याप मिळालेले नाही. तसेच हे वेतनही टप्प्याटप्प्याने दिले जाणार असल्याने बॅंकाचे हप्ते असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.