पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे. त्याबाबतचा कार्यक्रम शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे शहरामध्ये निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे.
निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय 46 प्रभागांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर हरकती व सूचना घेऊन त्याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. आयोगाकडून अंतिम मंजुरीची अद्याप प्रतीक्षा आहे. महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी शहरातील प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सोमवार (दि. 7) पासून खराळवाडी येथील पक्ष कार्यालयामध्ये इच्छुकांनी जमा करायचे आहेत. इच्छुकांना अर्ज जमा करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शनिवारी (दि. 12) सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत इच्छुक अर्ज सादर करू शकणार आहेत. अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी पक्ष कार्यालयातून छापील अर्ज घेऊन जायचे आहे. त्या अर्जासोबत आपल्या प्रभागात केलेल्या कामाचा कार्य अहवाल जोडायचा आहे, असे पत्रकात म्हटले आहे.