पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे.
प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेस दिले होते. त्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या मूळ याद्या व पुरवणी यादी वापरून कामकाज करण्यात आले. कर्मचाऱ्यांना मतदार यादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
एका कर्मचाऱ्यास मतदार यादीचे सहा भागांची जबाबदारी होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी नवीन प्रभागात त्या-त्या मतदारांची नावे आहेत की नाही हे तपासले. त्यांच्या नोंदी निवडणूक आयोगाने दिलेल्या कंट्रोल चार्ट तसेच, एमएस एक्सेलमध्ये भरण्यात आल्या. ते काम पूर्ण झाले आहे. कंट्रोल चार्टमध्ये भरण्यात आलेली मतदारांची नावे योग्य आहेत की नाहीत याची तपासणी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. त्यामुळे प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. प्रभागरचनेस अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या तयार करून त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.