पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभागरचनेवरील हरकतींवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी झाली. सुनावणीनंतर आवश्यक शिफारशींसह अहवाल बुधवारी (दि.2) राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने सादर केला आहे. त्यामुळे आता अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर कधी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची प्रारूप रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. 14 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत यावर 5 हजार 684 हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींवर 25 फेब्रुवारी रोजी प्राधिकृत अधिकारी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी कवडे यांच्या शिफारशीसह अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने आयोगाला सादर केला.
यामध्ये प्राधिकृत अधिकारी यांच्या शिफारशी, तसेच महापालिकेची बाजू देखील मांडण्यात आली आहे. यानंतर आयोगाकडून अंतिम प्रभागरचना होण्याची प्रतीक्षा आहे. अंतिम प्रभागरचना व आरक्षण सोडत झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे प्रभागरचनेच्या अंतिम मंजुरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.