मुंबई : राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. यावेळी बोलताना त्यांनी,”तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.
भाजपवर टीका करत किशोरी पेडणेकर यांनी, “हिंदुत्व हे मानणारं हिंदुत्व आहे. देश आणि मुंबईला अस्थिर करणारं हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे स्थिर आहे. प्रत्येक धर्माचा आदर करावा हे आपल्याला आपल्या आईवडील आणि गुरुजणांनी शिकवलं आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सुनावले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाबत काही तक्रारी होत्या. केंद्र सरकारनेही सांगितले होते. पालिकेने यापूर्वीही राणेंना तसं कळवलं होतं हे राणेंनीच सांगितले आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी त्यांचे काम करत आहेत. राणे त्यांना मदत करतील अशी अपेक्षा आहे, असेही महापौरांनी सांगितले.
नारायण राणे यांच्या बंगल्यात सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचं केंद्राने सांगितलं होतं. महापालिकेची टीम पहिल्यांदाच राणेंच्या बंगल्यावर गेली नाही. बंगल्यातील काही पोर्शनमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे ते पाहणी करायला गेले आहेत. राणे त्यांना सहकार्य करतील ही अपेक्षा आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले,
यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केले. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे एखाद्या मुलीबाबत बातमी देताना काळजी घ्या. दिशा सालियनच्या आईनेही या संदर्भात माहिती दिली आहे. गेलेल्या मुलीचं चारित्र्यहनन करायला नको. दोषी असतील तर नक्की कारवाई होणार. पण गेलेल्या मुलीबद्दल इतकं नका बोलू. तिचे आई वडीलही इतकी विनंती करत आहेत, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. महिला आयोगाला जाऊन सांगायची गरज नाही. त्यांना मेलवर पत्र जाईल. रुपाली पाटणकर सक्षम आहेत. त्या नक्कीच चौकशी करतील. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. कारण नसतात त्या मुलीचं नाव घेऊन काही जण त्या मुलीच्या आई-वडिलांना यातना देत आहेत. असं करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.