गडचिरोली- जिल्ह्यातील माओवाद्यांना स्फोटक निर्मिती साहित्यांचा पुरवठा करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. चार जणांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. गडचिरोली पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. राजू गोपाल सल्ला (31 रा. करीमनगर, तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (24 अहेरी-गडचिरोली), साधू लच्चा तलांडी (वय 30), मोहम्मद कासीम शादुल्ला (करीमनगर, तेलंगणा) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. तर छोटू ऊर्फ सिनू मुल्ला गावडे (मौजा भंगारामपेठा अहेरी) सध्या फरार आहे.
हिंसक कारवायात वापरण्यात येणारे बी जी एल तसेच हॅंडग्रेनेड आणि बॉम्ब तयार करण्यासाठीचे कार्ड एक्स वायरचे बंडल. माओवाद्यांना पुरवठा होणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दामरंचा पोलीस ठाण्याच्या पार्टी व शीघ्र कृती दल (क्युआरटी) जवानांनी कारवाई करत मौजा भंगारामपेठा गावातून चार जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 3 हजार 500 मीटर लांबीची कार्डेक्स वायर असलेले दहा बंडल जप्त केले आहेत.
संबंधित टोळी भंगाराम पेटा या गावातून संबंधित साहित्य घेऊन माओवाद्यांना देण्यासाठी जात होती. यावेळी दामरंचा पोलीस ठाण्यातील जवानांनी सापळा रचून चार जणांना अटक केली आहे. चारही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. यामधून आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.