पुणे महापालिकेने 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी शेअर्स बाजारात 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारले. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकातही कर्जरोखे उभारण्यासाठी तरतूद केली जात होती. नदी सुधारसाठी 200 कोटी, नंतर पाणीपुरवठ्यासाठी 400 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. गेल्या चार वर्षांपासून चर्चेमध्ये असलेला कर्जरोखे यंदाच्या अंदाजपत्रकातून गायब झाले आहे.
भांडवली बाजारातून रोखे उभारण्यासाठी मर्चंट बॅंकर या महापालिकांना साह्य करतात. विश्वस्त, निबंधक कायदेशीर सल्लाही देतात. त्या अनुषंगाने खुल्या बाजारातून कर्जरोखे उभारण्यासाठी महापालिकेने नियोजन केले होते. भांडवली बाजारात सरकारी कर्जरोखे हे एक महत्त्वाचे गूंतवणूक साधन आहे.
पिंपरी चिंचवडसारख्या औद्योगिक आणि वित्तीयदृष्ट्या प्रगत महापालिकेची पत भांडवली बाजारात इतरांपेक्षा अधिक चांगली असल्याने कर्जरोखे हे एक चांगले साधन ठरणार असल्याचा व्यक्त केला होता. त्यासाठी मागील वर्षी विविध योजनांसाठी 400 कोटींचे कर्जरोखे उभारण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र काहीही कार्यवाही झाली नाही. यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये कर्जरोखे उभारण्याबाबत काहीही तरतूद करण्यात आली नाही.