येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : एकाला अटक, तर दोघे अल्पवयीन ताब्यात
पुणे – कबुतर चोरी केल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाला चमड्याचा पट्टा व लाकडी बॅटने मारहाण करण्यात आली. ही घटना येरवडा येथील अनुसया शाळेच्या आवारात बुधवारी (दि.16) दुपारी घडली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
लहान मुलगा गयावया करत असतानादेखील दुसरा मुलगा त्याला शिविगाळ करत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आदित्य मोहिते (वय.18, रा. गणेशनगर, येरवडा) याला अटक केली. दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. याबाबत मारहाण झालेल्या मुलाच्या 38 वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली आहे.
येरवड्यातील औद्योगिक वसाहत शेजारी असणाऱ्या महापालिकेच्या अनुसयाबाई सावंत शाळेच्या आवारात अल्पवयीन मुलाला काही मुले कबुतर चोरल्याच्या वादातून पट्टा, बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने काढला. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.
याप्रकरणी जखमी बालकाची वैद्यकीय तपासणी करून अहवाल मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख व तपास पथकाचे प्रमुख अंकुश डोंबाळे यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले.