नवी दिल्ली – लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेशी संबंधित केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून आज नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकी चालकाला दंड भरावा लागू शकतो.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लहान मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना हे नियम लागू असणार आहेत. यानुसार 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांना दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे आवश्यक असेल. तसेच दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
या नवीन वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.
तसेच सेफ्टी हार्नेस हलके, जलरोधक आणि गादीयुक्त असावे. यामध्ये मूल विश्रांती घेऊ शकतील. तसेच त्याची क्षमता 30 किलोपर्यंत भार सहन करण्याची असावी. हा नियम लागू झाल्यानंतर हेल्मेट आणि सेफ्टी गियर बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे.
सायकल हेल्मेटचाही वापर?
बीआयएसने अद्याप लहान मुलांच्या हेल्मेटसाठी स्वतंत्र मानक जारी केलेले नाही. तोपर्यंत लहान मुलांसाठी सायकल हेल्मेटचा देखील वापरता केला जाऊ शकतो. सरकारने 25 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा रस्ता सुरक्षेसाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्यासाठी ही मसुदा अधिसूचना आणली होती.