मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
त्यांच्या या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही खरपूस समाचार घेतालय. आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू या संजय राऊतांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधलाय. आमच्या चुका तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असं कसं चालेल, असा सवाल मुनगंटीवारांनी संजय राऊतांना विचारलाय.
दरम्यान, संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पत्र लिहिलं आहे. राऊत यांनी ईडीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ईडीनं माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात कट रचल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पत्रांचा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘सत्यमेव जयते’ म्हटले आहे.