कामेंग (अरुणाचल प्रदेश) – अरूणाचल प्रदेशातील कामेंग भागात झालेल्या सोमवारी हिमस्खलनात सात जवान दबले गेले. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. कामेंग भागातील पर्वतीय क्षेत्रात गस्त घालणारे सात जवान या हिमस्खलनात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या बचाव कार्यासाठी पथकाला विमानाने घटनास्थळावर उतरवण्यात आले असल्याचे लष्कराच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसामत येथे विलक्षण बर्फवृष्टी होत असल्याने हा भाग धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आला होता. पर्वतीय क्षेत्रात हिवाळ्यात गस्त घालणे जिकिरीचे असते. यापुर्वीही अशा भागात हिमस्खलनात अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. मे 2020 मध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान सिक्कीममध्ये हिमस्खलनाखाली सापडून मरण पावले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात उत्तराखंडाती त्रिशूल पर्वतावर मोहिमेसाठी गेलेले पाच कर्मचारी मरण पावले. 2119 मध्ये सीयाचेन भागात सहा लष्करी जवान तर अन्य भागात 11 जण हिमस्खलनात मरण पावले आहेत, अशी माहिती फेब्रुवारी 2021मध्ये सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली होती.