पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार करून पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यावेळी या प्रकरणात अटक झालेल्या सुशील खोडवेकर या आयएएस अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी मंत्रालयातील आयएएस लॉबी कार्यरत झाल्याच्या चर्चेचे वृत्त प्रभातने प्रकाशित केले. त्यानंतर पुणे पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी मोहीम सुरू केली. “वुई सपोर्ट पुणे पोलीस’ या हॅश टॅगखाली सुरू असणाऱ्या समाजमाध्यमांतील मोहिमेत या प्रकरणाचा तपास अन्य कोणत्याही यंत्रणेकडे न सोपवता पुणे पोलिसांकडेच ठेवण्यासाठी या संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. दरम्यान, या सर्व संघटनांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे खास अभिनंदन केले आहे.
“टीईटी’ परीक्षेच्या निकालात फेरफार करून अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे 8 आर्थिक व्यवहार झाले असल्याची बाब पुणे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी प्रकरण हाती घेतल्यापासूनच सखोल तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर अँड टेक्नॉलॉजीचे संचालक अश्विन कुमार, डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक सौरभ त्रिपाठी, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या पाठोपाठ थेट मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाचे आयएएस दर्जाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांनाही अटक करण्याची धाडसी कारवाई करण्यात आलेली आहे. सुपे, डेरे यांच्याकडून लाखो रुपयांचे घबाडही हस्तगत करण्यात आले आहे. या घोटाळ्याची सूत्रे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. आणखी काही बडे “मासे’ हाती लागण्याची शक्यताही आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने केलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे. याबाबत सोशल मीडियांच्या विविध माध्यमांवर बऱ्याचशा विद्यार्थी संघटनांकडून मेसेज, पोस्ट फिरू लागल्या आहेत. पुणे पोलिसांकडून कोणत्याही दबावाला बळी न पडला “टीईटी’ घोटाळ्याची चौकशी प्रामाणिक व योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे एसआयटी, सीबीआय यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्याची आवश्यकता नाही, अशी मागणी युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य आणि डी.एड., बी.एड. विद्यार्थी संघटनांसह इतरही विविध संघटनांकडून करण्यात येऊ लागली आहे.
खोडवेकरला करोना; न्यायालयीन कोठडी
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019-20 मध्ये गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुशील खोडवेकर (वय-43) याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलिसांनी दिलेल्या अर्जानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान, बचाव पक्षातर्फे ऍड. एस. के. जैन आणि ऍड. अमोल डांगे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.