मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद तसेच विक्रमी 21 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवल्यावर स्पेनचा राफेल नदालने आपल्या निवृत्तीचा विचार बदलला आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ही माझी अखेरची ऑस्ट्रेलियन ओपन असेल असे त्याने म्हटले होते. मात्र, विजयानंतर त्याने आता सध्यातरी निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
रविवारी रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात पराभव केल्यावर नदालने आपली तंदुरुस्ती अद्याप कायम असल्याचे सिद्ध केले आहे. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा दुखापतीने त्रस्त होतो तेव्हा जर कोणी म्हणाले असते की मी यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवेन तर मला देखील पटले नसते.
मात्र, त्यानंतर जिद्दीने व मेहनत घेत तंदुरुस्त झालो व नकारात्मकता बाजूल सारून कोर्टवर परतलो. दुखापतीने निवृत्तीचाही विचार मनात आला होता. मात्र, हे प्व विसरून या स्पर्धेत खेळलो. आता विजेतेपदानंतर माझा हुरुप वाढला असून इतक्यात तरी निवृत्ती घेणार नाही, असे नदालने सांगितले आहे.