मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल कामगिरी करत असलेस्या अस्लान कारात्सेवने पुरुष तर मारिया साकारी व नाओमी ओसाका यांनी महिलांच्या एकेरीत आपापले सामने जिंकत आकेगूच केली.
साकारीने क्विनवेन झेंगचा 6-1, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. नाओमी ओसाकाने मेडीसन ब्रेंगलचा 6-0, 6-4 असा पराभव केला. पुरुष एकेरीत कारात्सेवने मॅकेंझी मॅक्डोनाल्डवर 3-6, 6-2, 6-2, 6-3 अशी मात केली. मॅटो बॅरेट्टीनीने स्टेफान कोज्लोव्हचा 6-1, 4-6, 6-4, 6-1 असा पराभव केला.
त्यापूर्वी झालेल्या अन्य लढतींत ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि रशियाचा डॅनिल मेदवेदेव या खेळाडूंनी विजयी सुरुवात केली. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चौथ्या मानांकित त्सित्सिपासने स्वीडनच्या मिकाइल यमेरला 6-2, 6-4, 6-3 असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने स्विर्त्झंलॅडच्या हेन्री लाक्सोनेनवर 6-1, 6-4, 7-6 (7-3) अशी मात केली. किर्गीयॉसने पहिल्या फेरीत ब्रिटनच्या लियाम ब्रोडीचा 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला.
ब्रिटनचा अनुभवी खेळाडू अँडी मरेने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत विजयी पुनरागमन करताना चुरशीच्या सामन्यात जॉर्जियाच्या निकोलोझ बासिलाश्विलीला 6-1, 3-6, 6-4, 6-7, 6-4 असे पराभूत केले. ब्रिटनच्या एमा रॅडूकानूने पहिल्या फेरीत स्लोन स्टीफन्सला 6-0, 2-6, 6-1 असे नमवले. स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने फ्रान्सच्या क्लारा बुरेलवर 6-3, 6-4, तर रोमानियाच्या सिमोना हालेपने पोलंडच्या माग्दालेना फ्रेचवर 6-4, 6-3 असा विजय प्राप्त केला.