कुरवली – चिखली (ता. इंदापूर) येथील शेतकरी यांचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी 18 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील कुरवली येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रवीण सुखदेव भगत असे या तलाठ्याचे नाव असून ते कुरवली सजा येथे कार्यरत आहेत. तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता.
हे काम करून देण्यासाठी भगत याने 18 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 12 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. दरम्यान, तक्रारदाराने पुणे लाचलुचपत विभागात (एसीबी)कडे तक्रार केल्यानंतर एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. भगत याने बारामतीतील घरी तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावले होते. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास भगत याच्या घराबाहेर सापळा रचत पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात कुरवली तलाठी सजाअंतर्गत जांब, चिखली, मानकरवाडी या गावाचा समावेश होतो. आठवड्यातून एकदा कार्यालयात मुखदर्शन देणाऱ्या तलाठी यांचेवरील लाचलुचपत विभागाची झालेल्या कारवाईचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. चिरीमिरीसाठी अडवणूक करणे, कामासाठी दिरंगाई करणे, आठवडा बाजार दिवशी कार्यालयात हजेरी लावून आर्थिक तडजोड करणे अशा मुजोर व भ्रष्ट तलाठी याचेवर झालेल्या कारवाईचे शेतकरी व नागरिकांनी स्वागत केले आहे.
या तलाठीच्या काळातील सर्व प्रकरणाची नोंदी व बोजा कमी करणे, वाळू चोरीच्या कारवाईमध्ये आर्थिक मागणी करून मागणी पूर्ण न केल्यास जाणीवपूर्व एकाच जणावर वारंवार छापा टाकून घराजवळचे वाहने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करणे, वारसनोंद प्रकरणात आर्थिक व्यवहारसाठी शेतकऱ्यांना ताटकळत ठेवणे, आर्थिक व्यवहार करुन चुकीच्या नोंदी लावणे या सर्व बाबीची तपासणी करण्यात यावी. तसेच तलाठी यांच्या आर्थिक संपत्तीची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करीत आहेत.