सातारा – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला असून जानेवारी महिन्यातील उच्चांकी 735 करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्यांच्यावर गेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणखी सतर्क झाले आहे.
जिल्हा प्रशासन जानेवारी महिन्यापासून करोना आणि ओमायक्रॉन अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. सध्या तालुकानिहाय करोना केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी जास्तीत जास्त नागरिकांच्या करोना चाचण्या करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
जास्तीत-जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे.प्रशासकीय व खासगी कार्यालयांमध्ये नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख 55 हजार 396 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. दोन लाख 45 हजार 591 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सहा हजार 504 नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात चार हजार 559 चाचण्या करण्यात आल्या. यामधील 734 बाधित रुग्ण आढळले. जानेवारीत सुरवातीला पॉझिटिव्ह रेट 3.45 टक्के होता. आता बाधितांची रेट सोळा टक्यांच्या पुढे गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्हा परिषदेत आणखी सतर्कता
जिल्हा परिषदेत दोन अधिकारी आणि काही कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर करोना नियमावलीची आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येत असून अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. प्रशासन आणखी सतर्क झाले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.