लहानपणी मुलगा-मुलगी आपल्या माता-पित्यापासून दुरावतात व पुढे अनेक वर्षांनंतर एखाद्या चमत्काररूपी घटनेतून पुन्हा एकत्र येतात अशी मिळती-जुळती पटकथा असलेले अनेक हिंदी चित्रपट तुम्ही पहिले असतील. मात्र एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच घटना चीन येथे घडली आहे. येथील एक तरुण तब्बल ३० वर्षानंतर आपल्या आईला भेटला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ली जिंगवेई असे या तरुणाचे नाव असून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याचे मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीकडून अपहरण करण्यात आले होते. २४ डिसेंबरला या तरुणाने चीन येथील प्रसिद्ध व्हिडीओ शेअरिंग ऍप ‘डौईन’वर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्याने आपल्या स्मृतीत असलेल्या आपल्या गावाचा नकाशा तयार केला होता.
पोलिसांनी याबाबत शहानिशा केली असता युनान प्रांतातील एका छोट्याशा गावामध्ये मुलगा हरवलेली एक महिला रहात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर दोघांच्याही डीएनए चाचण्या करण्यात आल्या. त्यातून तो मुलगा त्या महिलेचा असल्याचं समोर आलं. अखेर शनिवारी त्या दोघांचीही तब्बल ३० वर्षानंतर भेट झाली.
दोघांची तब्बल ३० वर्षानंतर पहिल्यांदाच भेट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ली हळुवार आपल्या आईचा मास्क काढून तिच्याकडे पाहताना दिसतोय. क्षणार्धातच दोघांचेही डोळे पाणवतात व ते गळाभेट घेतात.
आईसोबत भेट झाल्यानंतर ली जिंगवेईने ‘डौईन’ऍपवर भावुक पोस्ट लिहली. यामध्ये त्याने अखेर ३ दशकांची प्रतीक्षा अखेर संपली. मला मदत केलेल्या सर्वांचे आभार असा संदेश दिला आहे.
१९८९ च्या दरम्यान चीनच्या युनान प्रांतातील दक्षिण-पश्चिम भागातील झाओटॉन्ग शहरानजीक लीचे अपहरण करण्यात आले होते. त्याला येथून १८०० किमी दूर वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबाला विकण्यात आले.
ली सध्या गुआंग प्रांतात वास्तव्यास असून त्याने त्याच्या दत्तक मातापित्यास आपल्या खऱ्या माता-पित्याविषयी विचारले असता त्याला कोणतीही माहिती मिळाली नव्हती. अखेर त्याने यासाठी समाज माध्यमावर पोस्ट करायचे ठरवले.
“मी माझं घर शोधतोय. मला माझ्या शेजारी राहणाऱ्या एका टकल्या माणसाने १९८९ च्या सुमारास पळवून नेले होते. तेव्हा मी केवळ चार वर्षांचा होतो. हा माझ्या गावाचा नकाशा आहे. जो मी लहानपणीच्या स्मृतीतून बनवला आहे.” असं तो व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय.
यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. परिणामी ली आता आपल्या खऱ्या आईला भेटू शकला आहे. चीनमध्ये दरवर्षी हजारो बालकांचे अपहरण होते. २०१५ च्या आकडेवारीनुसार चीनमध्ये २० हजार बालकांचे अपहरण झाले होते.