नवी दिल्ली – पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेलगत हवेत घिरट्या घालणारे ड्रोन भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी अचूक मारा करून पाडले. ते ड्रोन चीनी बनावटीचे होते.
सीमेलगत तैनात असणाऱ्या जवानांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काळ्या रंगाचे ड्रोन पाहिले. त्यांनी तातडीने हालचाली करत ड्रोनवर मारा केला. अचूक माऱ्यामुळे ड्रोन जमिनीवर कोसळले. त्यामध्ये अंमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रे ठेवली नसल्याचे आढळले.
भारतीय हद्दीत अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे टाकण्यासाठी पाकिस्तानातून ड्रोन पाठवले जात असल्याचे याआधीच उघड झाले आहे. त्यामुळे बीएसएफचे जवान आणखीच सतर्कता बाळगत आहेत.
याआधीही ड्रोन पाडण्याच्या दोन घटना पंजाबमध्ये सीमेलगत घडल्या. नापाक कारवाया तडीस नेण्यासाठी आता दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.