तिरुवअनंतपुरम : जगाला भेडसावणाऱ्या करोनाची भारतात ज्या राज्यातुन एन्ट्री झाली त्याच केरळ राज्यात आता नव्या साथीने लोक हैराण झाले आहेत. केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायतमधून बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये ‘बर्ड फ्लू’ असल्याची पुष्टी झाली आहे. याबाबत सूचना मिळताच अधिकाऱ्यांनी प्रभावित भागात एक किलोमीटरपर्यंत भागातील बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश दिले आहेत.
फ्लूच्या प्रकोपाची सूचना मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी पशूपालन, आरोग्य आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने थाकाझी ग्राम पंचायत वॉर्ड क्रमांक 10 जवळील एक किमी भागातील सर्व बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश दिले.
संक्रमण पसरू नये म्हणून प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लू संभावित भागातील कोंबड्या, बदके आणि पक्षांचे अंडे, मांस आदीच्या विक्रीवर रोख आणला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रीकुन्नपुझा, थकाझी, पुरक्कड़, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर हरिप्पड नगरपालिका भागात प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यासोबतच प्रशासनाने या भागातील पक्ष्यांना पकडणे आणि त्यांना नष्ट करण्यासाठी पशूपालन विभागाची एका टीमचे गठण केले आहे.
नुकतेच मध्यप्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातून कमीत कमी 48 कावळे मृत अवस्थेत आढळल्यानंतर यात एच 5 एन 8 व्हायरस म्हणजेच ‘बर्ड फ्लू’ची पुष्टी झाली होती. याशिवाय राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातूनही ‘बर्ड फ्लू’ची प्रकरणे समोर आली आहेत. ज्यात 5 दिवसात 60 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता.