बारामती/ जळोची – बारामती शहरात पुणे जिल्हा क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे संकुलाचे रुपडे पालटणार आहे. बारामतीनगरी आता “क्रीडा हब’ म्हणून उदयास येत आहे. क्रीडा संकुलाच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी मदत होणार आहे.
क्रीडा संकुलात मुलांच्या वसतिगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे खेळाडूंच्या निवासाची चांगली सोय होणार आहे. कबड्डी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जिम, हॉलीबॉल, कराटे, बॉक्सींग, टेबल टेनिस, स्पोर्टस झुम, फिटनेस योग, ओपन जिम आदी सुविधा यात अंर्तभूत
आहेत, अशी माहिती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या नूतनीकरनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे राजेश बागुल व क्रीडा मार्गदर्शक अविनाश लगड यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा क्रीडा संकुल पुणे अंतर्गत एमआयडीसी कटफळ येथे 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, 5 हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी, हॉकी मैदान, चेंजिंग रुम, क्रीडा साहित्य रुम, स्केटिंग रिंग, शुटिंग रेंज, जलतरण तलाव, फिल्ट्रेशन प्लांन्ट, विविध खेळांची मैदाने,
मुलामुलींचे वसतिगृह, वेटलिफ्टिंग हॉल, एक्सरसाईज हॉल, कराटे, बॉक्सिंग, फुल आर्चरी रेंज, सायकलिंग ट्रॅक, बहुउद्देशीय हॉल, व कॉन्फरन्स रुम आदी कामे प्रगतीपथावर असून ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
संकुलाशेजारील मार्केट यार्ड येथील 3 एकर जागेत बॉक्सिंग हॉल, कुस्ती हॉल, टेबल टेनिस, मिनी स्केटिंग रिंग कराटे, कबड्डी हॉल, खो-खो मैदान, जीम, 10 मीटर शुटींग रेंज, मिनी आर्चरी मैदान व बॉस्केटबॉल मैदान आदी कामेही प्रगतीपथावर आहेत.
तालुका क्रीडा संकुल माळेगाव येथे 11 एकर जागेवर 400 मीटर धावणे मार्ग, बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल, कराटे, क्रिकेट, पोलीस प्रशिक्षण, जिम, लॉन टेनिस कोर्ट, व्हॉलिबॉल, कबड्डी आणि खो- खो मैदान तयार केले आहेत.
संकुलामध्ये तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शकांच्या माध्यमातून युवा खेडाळूंना खेळाचे महत्व पटवून देण्यात येते. युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध शासकीय योजना यशस्विपणे राबविण्यात येत आहेत. विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत असल्याने क्रीडा संकृती रुजविण्यासाठी त्याची मदत झाली आहे.
बारामती शहर आणि ग्रामीण भागतील खेळाडूंचा स्पर्धामधील सहभाग वाढत आहे. संकुलातील सुविधांचा युवा खेळाडूंना विशेष उपयोग होणार आहे. खेळाडूंना सुविधेसोबत प्रशिक्षणही देण्यात येते. तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना 2002 मध्ये 44 देशांच्या आशियाई
खेळामध्ये ऍथलॅटिक्स खेळ प्रकारात पदक मिळाले आहे. त्यांनी तिन्ही सेनादलामध्ये ऍथलॅटिक्स खेळाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना त्यांच्यासारख्या निष्णात प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळणे ही जमेची बाजू आहे.