इंदापूर -इंदापूर तालुक्यातील ज्या गोरगरीब लोकांनी मला आमदारकीच्या, मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले आहे. त्या नागरिकांना मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या मदतीला धावून जाणार त्यामुळे काळजी करू नका, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शासकीय उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या मोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचा प्रारंभ सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 9)करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व पदाधिकारी, नगरपरिषदेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करीत होते.
भरणे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिकवणीनुसार गरिबाचे काम आपले म्हणून काम करतो. त्यामुळे तालुक्यातील एकही दिव्यांग,
वयोवृद्ध वयोश्री योजनेचा लाभ घेण्यावाचून राहणार नाही. शेवटच्या माणसापर्यंत योग्य उपचार त्यांना लागणारी साधने पुरवली जातील, या योजनेअंतर्गत तब्बल 32 प्रकारचे साहित्य लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येईल.
सर्व प्रकारच्या रुग्णांना त्यांच्या असणाऱ्या आजारावर मात करता यावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठे आरोग्य शिबीर काही दिवसांतच आयोजित करणार आहे.
यामध्ये राज्यातील नामांकित डॉक्टर तज्ञ बोलवण्यात येतील. व एकाही रुग्णाला आजारपणाच्या वेदना आगामी काळात होणार नाहीत. याची खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.