पिंपरी – शहरातील 1 लाख 20 हजार 123 कुटुंबाना आणखी चार महिने मोफत धान्य मिळणार आहे. त्यांना डिसेंबर महिन्यातील धान्य वाटपाला साधारण 12 तारखेपासून सुरुवात होणार आहे. तर, नोव्हेंबर महिन्यातील शिल्लक राहिलेले धान्य वाटप पूर्ण करण्यासाठी 5 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांसाठी डिसेंबर-2021 ते मार्च-2022 या कालावधीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याव्यतिरिक्त दरमहा प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य दिले जाणार आहे.
त्याशिवाय, अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक कुटुंबाना देखील प्रति सदस्य दरमहा 5 किलो या परिमाणात मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू वितरित केला जाणार आहे.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गरीबांना अन्नधान्य मोफत देण्याची मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत होती. मात्र, आता त्यामध्ये चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. शहरातील 253 स्वस्त धान्य दुकानांतून एकूण 1 लाख 20 हजार 123 रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे.
अन्नसुरक्षा आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबरपासून मार्चपर्यंत पुढील चार महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य देण्यास राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार रास्त भाव धान्य दुकानांमध्ये नागरिकांना 12 तारखेपासून धान्य मिळणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 719 दुकानांमधून हे धान्य वाटप करण्यात येईल. नोव्हेंबर महिन्यातील 93 टक्के धान्य वाटप झाले आहे. 5 डिसेंबरपर्यंत त्यासाठी मुदतवाढ दिली आहे. – सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी.