फुरसुंगी – हडपसर-सासवड महामार्गावर भेकराईनगर ते उरुळीदेवाची फाटा पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण आणि रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकण्यात आला होता. परंतु, पावसामुळे मुरूम वाहून गेला असून पुन्हा एक-दोन फुट खोल आणि तीन-चार फूट लांबीच्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
हडपसर-सासवड रस्त्याच्या साइडपट्ट्या तसेच खड्डे मुरूम टाकून बुजविले होते. मात्र, यामुळे पावसाने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. फुरसुंगी येथील रेल्वे उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे सतत वाहतूककोंडी होत असते, त्यात आता या खड्ड्यांची भर पडली आहे. बुधवारी (दि.1) झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. तर, आज
पावसाळी वातावरण आणि धुक्यामुळे समोरचे वाहन पाहायचे की खड्डे चुकवायचे यात वाहतुकीचा वेग मंदावला होता.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?
वाहन खरेदी करताना रस्त्याचा एकरकमी कर भरणा तसेच पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, अशा स्थितीतही वाहन चालविण्यासाठी रस्ते चांगले असावेत, अशी अपेक्षा नारिकांची असताना संबंधीत विभाग त्यांचे हे काम का करीत नाहीत? महामार्ग विभाग आणि रस्ते विभागातील अधिकारी-पदाधिकारी यांचे हडपसर-सासवड या रस्त्याकडे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल युवासेनेचे शादाब मुलाणी, राष्ट्रवादीचे सोमनात्र यादव यांनी केला आहे.