लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहातील कॉंग्रेस गटनेत्या व माजी उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश देत आमदार सुनील शेळके यांनी कॉंग्रेसला धक्का दिला आहे. सोबतच भाजपाचे माजी गटनेते व नगरसेवक भरत हारपुडे यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला .
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून मावळ राष्ट्रवादीमध्ये “इनकमिंग’ जोरात सुरू आहे. आरोही तळेगावकर या कॉंग्रेस पक्षाकडून दोनवेळा नगरसेवक झाल्या असून, विद्यमान कार्यकाळात त्यांनी उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती तसेच कॉंग्रेस पक्षाचे गटनेते ही पदे भूषवली आहेत.
सध्याच्या पंचवार्षिक काळात लोणावळा नगरपरिषदेत भाजपा, कॉंग्रेस व आरपीआय अशी सत्ता असून, तळेगावकर या सत्तेमध्ये असताना देखील त्यांच्या अचानक पक्ष प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भरत हारपुडे हे देखील भाजपाच्या चिन्हावर दोनवेळा निवडून आले होते. त्यांनी देखील उपनगराध्यक्षपद तसेच गटनेते पद भूषविले आहे. या पंचवार्षिक काळात सुरुवातीचे काही दिवस वगळता हारपुडे हे सत्ताधारी भाजपापासून वेगळे झाले होते. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत राहून त्यांनी भाजपाला कायम विरोध केला होता.
तळेगावकर व हारपुडे यांच्यासह भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष गणेश इंगळे व अन्य काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, मावळ कार्याध्यक्ष दीपक हुलावळे आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजप व कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने याचा लोणावळा भाजप व कॉंग्रेस यांना धक्का बसला असून, याचा फायदा आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.