मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरच्या भावात सहा टक्क्याने वाढ झाली. त्याचबरोबर शेअर बाजारात खरेदीचे वातावरण असल्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांक उंचावले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 454 अंकांनी वाढून 58,795 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 121 अंकांनी वाढून 17,536 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच आयटीसी, इम्पोसिस, टेक महिंद्रा, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर इंडसइंड बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बॅंक, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. मुख्य निर्देशांकांबरोबरच मिड कॅप कॅप आणि स्मॉल अनुक्रमे 0.7 व 1टक्क्यांनी वाढले.
ऊर्जा, आरोग्य, रिऍल्टी, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या शेअरच्या भावात आज वाढ नोंदली गेली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 5,122 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली.
जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. अमेरिकेमधील बेकारी 52 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेली असल्यामुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. भारतातील राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. ती सकारात्मक असण्याची शक्यता बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटते.
गुंतवणूकदार कमालीचे सावध आहेत. मात्र तरीही खरेदी झाली तर निफ्टी 17,600 ते 17,800 अंकापंर्यंत वाढू शकतो. विक्री झाली तर निफ्टी 17,350 अंकांवर चांगला आधार आहे, असे रेलिगेअर ब्रोकिंग या ब्रोकरेज संस्थेचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.
कोणत्या औषधी कंपन्या तेजीत?
आरोग्यविषयक संवेदनशीलता वाढल्यामुळे सध्या औषधी कंपन्यांना शेअर बाजारात चांगले दिवस आहेत. ज्या कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत त्यांच्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा राहण्याची शक्यता आहे. कॅडीला हेअल्थकेअर, डॉक्टर रेड्डीज, सन फार्मा, अरबिंदो फार्मा, सिप्ला, दिविज लॅबरोटरीज, आयपीसीए लॅबरोटरीज, टोरेंट फार्मास्युटिकल्स, लुपीन, बायोकॉन, लॉवरस लॅब, सनोफी इंडिया, अबोट इंडिया, सोलारा ऍक्टिव फार्मा, ग्लॅंड फार्मा या कंपन्या तेजीत राहण्याची शक्यता शेअरखान या ब्रोकरेज संस्थेला वाटते.