पुणे- लॉकडाऊननंतर मंदिरे सुरू झाल्यानंतरची पहिलीच अंगारकी चतुर्थी मंगळवारी (23 नोव्हेंबर) असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यातच शिवाजी रस्त्यावर ड्रेनेजलाइनचे काम सुरू असल्याने वाहतूक संथ होत असते. या पार्श्वभूमीवर शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
दि.23 नोव्हेंबर रोजी संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार सकाळी 7 वाजल्यापासून गर्दीसंपेपर्यंत वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांसाठी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले.
या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
*पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणारी वाहने पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौकमार्गे एफसी रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
*शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणारी वाहने स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक इच्छितस्थळी जातील.
*स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारी वाहने जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.
*अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने, वाहने बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जाहीत.