रोम – पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेसाठी रोममध्ये दाखल झाले आहेत. जवळपास 12 वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी रोमला भेट दिली आहे. पंतप्रधान आज सकाळी रोमला पोहोचले. याप्रसंगी इटलीच्या वरिष्ठ अधिकारी आणि इटलीतील भारताचे राजदूत यांनी त्यांचे स्वागत केले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा इटलीची राजधानी रोमचा हा पहिलाच दौरा आहे, असे इटलीतील भारताच्या राजदूत नीना मल्होत्रा यांनी सांगितले. रोमला पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दुपारी येथील महात्मा गांधी पुतळ्याला भेट दिली. यानंतर साडेपाच वाजता इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेतली.
इटली भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते रोममध्ये या महामारीत जागतिक आर्थिक आरोग्य सुधारण्यावर चर्चा करतील. मोदी 29-31 ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत आणि नंतर यूकेला जाणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी कार्बन स्पेसच्या न्याय्य वितरणासह हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज यावर बोलतील.
रोममध्ये, मी 16व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहीन. तिथे मी इतर जी-20 नेत्यांसोबत जागतिक आर्थिक आणि आरोग्य पूर्ती, शाश्वत विकास आणि हवामान बदल यांवर चर्चा करेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.