मुंबई – एनसीबीचा उलटलेला पंच प्रभाकर साईल याने त्याच्या व्हिडीओ मध्ये ज्या सॅम डिसोझाचे नाव घेतले आहे तो सॅम डिसोझा हा मुंबईतील मनि लॉड्रिंग प्रकरणातील मोठा प्लेअर असून तो अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांशीही संपर्कात असतो असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
क्रुझ पार्टीवरील कारवाईतील एनसीबीचा अनाधिकृत हस्तक के. पी. गोसावी याने या साऱ्या प्रकरणात डिसोझाशी बोलणी केली होती. व त्याच्या मार्फतच आर्यन खानला सोडण्यासाठी अभिनेता शाहरूख खान याच्याकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली होती अशी माहिती प्रभाकर साईल याने दिली आहे.
या साऱ्या प्रकरणात आणखीही काही नावे एक्स्पोज होणार आहेत असेही राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच या खेळ्या केल्या जात आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. प्रभाकर साईल याने या प्रकरणातील सत्य लोकांपुढे आणून देशाची मोठी सेवा केली आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर एनसीबीने स्वाक्षऱ्या घेतल्या ही गंभीर आणि धक्कादायक बाब आहे. पोलिसांनी याची आता स्वत:हून दखल घेतली पाहिजे असे त्यांनी कालच नमूद केले होते.