भाजप नेते विखे पाटील यांचा सल्ला; राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान
राहाता – केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याला धमकविण्याचा प्रकार यापूर्वी राज्यात कधीही घडला नाही. या तपास यंत्रणांना बदनाम करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा घ्यावा आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या वनस्पतींच समुळ उच्चाटन करण्याचे धाडस त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दाखवावे, असे आव्हान भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आज दिले.
लोणी येथे ते पत्रकारांशी ते बोलत होते. आ. विखे पाटील म्हणाले, स्वत:चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्याचे कारस्थान राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सुरु आहे. सरकारने मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करतांनाच वनस्पती असल्याचं सांगणाऱ्या नेत्यांनाही आवाहन करुन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा नायनाट करा, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारची अवस्था “नाचता येईना.. अंगण वाकडे..’ अशीच झाली आहे. काहीही झाले तरी, केंद्राकडे बोट दाखवायचे एवढाच धंदा त्यांचा सुरु आहे. लसीकरण जास्त झाले तरी, स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच त्यांनी धन्यता मानली. सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतही राज्य सरकार दुजाभाव करीत आहे.
विरोधकांच्या कारखान्यांना थकहमी नाकारली जात आहे. मात्र, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर केली पाहीजे, असेही मत विखे पाटील यांनी व्यक्त केले.