पुणे – नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून तसेच महापालिकेच्या विद्युत विभागाकडून गेल्या काही वर्षांत शहरात तब्बल 3 हजार 460 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यातील 3,205 सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नगरसेविका वृषाली चौधरी यांनी ऑक्टोबर महिन्याच्या मुख्यसभेसाठी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यातून ही बाब समोर आली आहे. तर, यातील 995 सीसीटीव्ही विद्युत विभागाकडून बसविण्यात आलेले असून उर्वरीत 2,465 सीसीटीव्ही नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून बसविण्यात आले आहेत.
त्यात, सर्वाधिक 411 सीसीटीव्ही शहराच्या मध्यवर्ती पेठांची हद्द असलेल्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. तर, सर्वात कमी 36 सीसीटीव्ही कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी तसेच समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रमुख उद्देश असताना वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्हींची आकडेवारी पाहता या उद्देशालाच हरताळ फासली
पाच क्षेत्रीय कार्यालयांत100 पेक्षा कमी सीसीटीव्ही
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नगरसेवकांच्या निधीतून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींमध्ये सर्वात कमी 36 सीसीटीव्ही कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय 100, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय 67, हडपसर 51, तर नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत
91 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तर, बंद असलेल्या सीसीटीव्हीमध्ये या भागातील सीसीटीव्हींची संख्या अधिक आहे.
कसबा, कोथरूडमध्ये सर्वाधिक सीसीटीव्ही
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीत कार्यालय हद्दीत सर्वाधिक 411 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तर, त्या खालोखाल 271 सीसीटीव्ही कोथरूड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असून घोले-रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 261, येरवडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 254, वानवडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 197, वारजे क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 165, औंध क्षेत्रीय कार्यालय हद्दित 158, नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयात 134 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.