हडपसर – महंमदवाडी (वाडकरमळा) येथे रविवारी (दि. १०) सात महिन्याच्या वासराचा फडशा पाडला. त्यानंतर आज महंदवाडीतील अंगुल पार्कमधून बिबट्या गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. त्यानंतर कंपाऊंडवरून उडी मारून संकेत पार्कमध्ये पायाचे ठसे दिसत असून, निखिल तरवडे यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्ट दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनाधिकाऱ्यांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, महंमदवाडी रस्त्यावरील जाधवमळा येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या डॉ. दादा गुजर शाळेजवळ पालखी मार्ग येथील अंगुल पार्क, लेन नं.२ मधील युनूस जमाल शेख यांच्या घराशेजारून बिबट्या रात्री दीडच्या सुमारास गेल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. कंपाउंडवरून बिबट्या उडी मारून संकेत पार्कमध्ये गेल्याचे दिसत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही वन अधिकाऱ्यांनी केले आहे.