पुणे –एचपी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी करंडक 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुण्यातील 5 निमंत्रित संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
ही स्पर्धा व्हीडीआर आणि आर्यन्स क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर येत्या मंगळवारपासून सुरू होणार आहे. करोनामुळे खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळत नसल्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना सरावाची व आपली गुणवता दाखविण्याची एक प्रकारे संधीच मिळणार आहे.
स्पर्धेत कंबाईन जिल्हा संघ, हेमंत पाटील क्रिकेट अकादमी, जनादेश इंडिया, वीराज आवटे क्रिकेट अकादमी, आर्यन्स क्रिकेट अकादमी हे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती एचपी प्रतिष्ठानचे हेमंत पाटील यांनी दिली.
ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असून अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.