कोल्हापूर – औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरुन कबनुर (तालुका हातकणंगले) येथील निर्दयी पित्याने आपल्या पाच वर्षीय मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणाची खुद्द बापानेच पोलिसांसमोर कबुली दिली आहे.
अफान सिकंदर मुल्ला (वय 5 रा. पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तर सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) या पित्यास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिन्याभरातील तिसर्या घटनेमुळे खळबळ उडाली असून रात्री उशीरापर्यंत नदीपात्रात मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कबनूर येथील सिकंदर मुल्ला हे मोलमजुरीचे काम करतात. त्यांना दहा वर्षाची मुलगी व पाच वर्षाचा अफान अशी दोन मुले आहेत. अफान याला फिटस्चा आजार असून घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचारावरील खर्चाच्या कारणावरून त्यांच्या कुटुंबात सतत वाद होत होता.
काही दिवसांपूर्वी सिकंदर हे दोन दिवस घराबाहेरच होते. ते घरी परतल्यानंतर नातेवाईकांनी त्याला खडे बोल सुनावले होते. आधीच मुलाचा औषधोपचाराच्या खर्चाने त्रस्त सिकंदर कुटुंबातील वादाने चिडून होते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उपचारासाठी जायचे या असे सांगून ते अफान याला सायकलवरून घेऊन घराबाहेर पडले. रात्री उशीरा ते एकटेच परतल्यानंतर आपल्या मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर सुरुवातीस नातेवाईक व नागरिकांनाही विश्वास बसला नाही. परंतु ते वारंवार सांगू लागल्याने अखेर त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत अफान याला मोठ्या पुलावरुन पंचगंगा नदी पात्रात फेकल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवार सकाळपासून अफान याचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या. मुलांना नदीत फेकण्याची मागील दोन महिन्यांतील शहर व परिसरातील ही तिसरी घटना असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.