नागपूर – करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्लेन्मार्क कंपनी औषध तयार करत आहे. हे औषध रुग्णांना नाकाद्वारे देण्यात येणार आहे. या नेजल स्प्रेची चाचणी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात केली जाणार आहे. करोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर याची चाचणी करण्यात येणार आहे.
करोनावर प्रभावी औषध तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. करोना पॉसिटीव्ह रुग्णांवर उपचारासाठी आता नेजल स्प्रे म्हणजेच, नाकावाटे दिल्या जाणारी उपचार पद्धती ही उपलब्ध होत आहे. ग्लेन्मार्क कंपनीने विकसित केलेला स्प्रे सध्या चाचणीच्या पातळीवर असून नागपूरात करोनाची सौम्य लक्षणं असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर या नेजल स्प्रेची चाचणी केली जाणार आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसिन विभागामार्फत महाविद्यालयातील रुग्णालयात या स्प्रेची क्लिनिकल ट्रायल होणार आहे.
करोनाचा संसर्ग नाकावाटे होत असल्यानं त्याचा उपचारही नाकावाटे दिल्या जाणाऱ्या स्प्रेद्वारे शक्य आहे, असा कंपनीचा तर्क आहे. चाचणीच्या निष्कर्षानंतर करोनावर उपचाराच्या दृष्टीनं हे औषध उपयोगी आहे की, नाही हे ठरणार आहे.
दरम्यान, नाकावाटे दिला जाणारा स्प्रे कोरोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावू शकेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, सर्व काही या स्प्रेच्या चाचणीच्या निष्कर्षांवर अवलंबित असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. या चाचणीत सहभागी होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांवर तो बरा झाल्यानंतरही अनेक दिवसांपर्यंत त्याच्या प्रकृती संदर्भात आणि संभाव्य परिणामा संदर्भात तज्ञ आणि डॉक्टर लक्ष ठेवून राहणार आहे.