हडपसर – राज्यात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा निषेध करीत राजमाता अहिल्यादेवी होळकर ब्रिगेड व मावळा ग्रुपने येथील गांधी चौकात आक्रोश आंदोलन केले. अत्याचाराच्या या घटनांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालवून अपराध्यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी होळकर ब्रिगेड व मावळा ग्रुपचे रेश्मा हाके, घनश्याम हाके यांनी केली.
अलिकडे एकापाठोपाठ एक घडत आलेल्या मुली व महिलांवरील अन्याय अत्याचाराने संपूर्ण राज्यात संतप्त भावना निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे काढून गुन्हेगारांचा निषेध केला जात आहे. हडपसर येथे राजमाता होळकर ब्रिगेड व मावळा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणा देत या घटनांचा जाहीर निषेध नोंदवला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीसांना दिले.
होळकर ब्रिगेड व मावळा ग्रुपचे पदाधिकारी रेश्मा हाके, घनश्याम हाके, सुफीयन शेख, गौस शेख, तुषार आरने, कुमार चक्रे, दीपक वाघमारे, किसन कोळपे, गणेश गोरे, अनुष्का हाके-बिचुकले, विठ्ठल मदने, अंजुम शेख, नेहा राजपूत, मनिषा जाधव, हेमलता सरकार, मनीषा लोंढे, पल्लवी गायकवाड, रजनी राठोड, अश्विनी हांडे, भाग्यश्री म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
“नोकरी-शिक्षणानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुली महिलांसह अनेक घरातील मुली महिलाही असुरक्षिततेच्या छायेत जगत आहेत. कायद्याची कठोर अंमलबजावणी झाल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही. त्यामुळे सरकारने महिलांच्या भावनांचा विचार करून माणूसकीला काळीमा ठरणाऱ्या अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून पिडीत महिला मुलींना न्याय द्यावा.’