खेड शिवापूर – साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी (ता.भोर) हद्दीतील उड्डाणपुलाखालून जुन्या बोगद्याकडे वळताना रस्त्यावर सुमारे चार फूट लांब, तर एक फूट खोल मोठे खड्डे पडले असल्याने यामुळे या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडीमोठ्या प्रमाणात होत असून, प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्यावरचे खड्डे आता पावसाच्या पाण्याने भरले असून, गाडी चालवताना ते लक्षात येत नाही आणि गाडी त्यामध्ये आदळते. पुणे-सातारा महामार्ग हा नेहमीच खड्ड्यांमुळे चर्चेत असतो. खेड शिवापूर नाक्यावर टोल वसुली जोरात सुरू आहे, मात्र त्याप्रकारची देखभाल संबंधित रिलायन्स इन्फ्राचे ठेकेदार करीत नसल्याचे दिसत आहे.
साताऱ्याकडून टोलनाका ओलांडल्यावर अनेक हॉटेल आहेत, या ठिकाणी बुजवलेल्या खड्ड्यांवरील पॅच पुन्हा निघू लागले आहेत. वेळू येथील सेवा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात त्या सेवारस्त्यावरून ओढ्याप्रमाणे पाणी वाहते. पुढे कात्रज जुन्या घाटाला वळताना सुमारे पाच फुटाचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे टोल भरूनही रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
एका बाजूच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूकडील खड्डे लवकरात लवकर बुजविले जातील, तसेच उड्डाणपुलाखाली खड्डे पडले आहेत ते तात्पुरते बुजवून पुढील काळात त्या ठिकाणचा रस्ता खोदून नवीन रस्ता करण्यात येणार आहे.
राकेश कोळ, अधिकारी, रिलायन्स इन्फ्रा