काबुल : अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने सत्ता स्थापन करत आपल्या सर्वोच्च नेत्याचे नाव जवळजवळ निश्चित केले आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंडला देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी बसवले जाणार आहे. तसेच दोन उपपंतप्रधानही नियुक्त करण्यात येणार असून मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची या पदांवर वर्णी लागणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंडचे नाव या पदासाठी सुचवले आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमधील प्रत्येक माहिती जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमांना देणारा जबीउल्लाह मुजाहिदीन हा अखुंडचा अधिकृत प्रवक्ता म्हणून काम करणार आहे.
सिराज जुद्दीन हक्कानीकडे अफगाणिस्तानच्या गृहमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हक्कानीच सर्व राज्यपालांची नावे निश्चित करणार आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयटएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचे काम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हक्कानीला सरकारची मोट बांधण्यासाठी फैज यांनी मदत केल्याचे सांगण्यात येते. तालिबान आणि अफगाणिस्तान लष्करामधील संघर्षामध्ये लष्कराचे फार नुकसान झाले . आयएसआयने हक्कानी नेटवर्कला सुरक्षा पुरवल्याचे सांगितले जात आहे. हक्कानी हा अलकायदाशी संबंध असणारा गट आहे. संयुक्त राष्ट्रांबरोबरच अमेरिकेनेही हक्कानी गटाला दहशतवादी गट म्हणून जाहीर केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रलायाचे नेतृत्व मुल्ला अमीर खान मुत्ताकीकडे सोपवण्यात येणार आहे. हे सरकार सध्या कार्यवाहक पद्धतीचं सरकार असणार आहे. तालिबानच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये सरकारची घोषणा केली जाईल. पंजशीरवरही तालिबानने ताबा मिळवल्याचा दावा केला जात आहे.