असे घडलो आम्ही…
उगवणारा दिवस उधळितो, नव्या स्वप्नांच्या आशा…
रात्रीच्या काळोखातूनही शोधतो, सत्याच्या दाही दिशा…
नवध्येय-नवचेतना लेवूनी उराशी, घडविते ‘शिक्षण’ मानवाशी…
राजगड ज्ञानपीठ संचलित सौ. निर्मलाताई थोपटे अध्यापक विद्यालय भोरने आम्हाला घडविण्यात अनमोल असे योगदान….कधीही न विसरण्यासारखे….
विद्यार्थी-शिक्षकांना घडवणारी ती मूर्तिमंत शाळा म्हणजे आम्हां विद्यार्थी-शिक्षकांचा परिसच! तो परिस म्हणजे आमचे अध्यापक विद्यालय. पुणे जिल्ह्यातील निसर्गाने नटलेला-बहरलेला सह्यगिरीचा भूभाग, प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, शिवरायांचा वसा आणि संस्कारांचा वारसा जपणारी शिवकार्यधरित्री म्हणजे भोरची धरती. त्या स्वर्गभूमीतील सौ. निर्मलाताई थोपटे अध्यापक विद्यालय भोर येथे डीएडसाठी प्रवेश मिळाला. फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेण्याचे सामर्थ्य याच विद्यालयाने दिले. शिक्षण प्रणालीचा एक धागा ‘शिक्षक’ बनून उज्ज्वल राष्ट्र, आदर्श नागरीक घडविण्याचे भाग्य लाभले फक्त याच विद्यालयामुळे… विद्यालयाच्या भिंतींनी अनेक समस्या, प्रसंग, अडचणींना सामोरे जाण्यासाठी निर्भीडता दिली. विद्यालयाच्या अंगाखांद्यांवर खेळलेल्या मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्याने षडरिपूंचा झाला नाश अन् स्नेहाचा, निर्मलतेचा लाभला निर्झर.
इथल्या प्रत्येक पाठातील जीवनमूल्यांनी दिला आत्मनिर्भरतेचा, स्वाभिमानाचा, स्वावलंबनाचा धडा. आयुष्यातील यशशिखरे पादाक्रांत करण्याचे धाडस दिले याच मातीने. प्रसन्नतेचा, आनंदाचा कूप भरून दिला याच शिक्षणसम्राज्ञीने जो आजही भरभरून ओसंडतो राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष आमदार संग्रामदादा थोपटे, मानद सचिव डॉ. भाग्यश्री पाटील विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ पाचारणे, प्रा. वैजयंता तांगडे, प्रा. ममता पवार, प्रा. विजय खुटवड, प्रा. भिकु यादव, प्रा. सुभाष कोंढाळकर, प्रा. भारत सुतार, प्रा. प्रिती गायकवाड, प्रा.वसंत मदने, प्रा. सुजाता निंबांळकर, प्रा. सीमा रहाणे, प्रा. सुचिता कुलकर्णी, प्रा. मंगल कंक, प्रा. विद्या बदक, प्रा. सुनिता वरे, प्रा. प्रशांत उबाळे, प्रा. योजना निगडे, प्रा. लालासाहेब बांदल, प्रा. पंढरीनाथ उल्हाळकर, वसंत टापरे, संजय खुडे, मोहन गुरव, अजित पोळ, लेखक-दिग्दर्शक प्रा. प्रकाश मोरे असे अष्टावधानी, अष्टपैलू, मार्गदर्शक गुरू लाभले. प्रा. दिपक येडवे, प्रा. प्रकाश मोरे यांनी कधी मित्र, सखा, सवंगडी बनून मैत्रीची शिदोरी तर कधी वडीलधारे बनून ज्ञानाची व संस्कारांची झोळी रिती केली. संस्कारक्षम जीवनाचा पाया घातला. अध्यापक विद्यालय भोरने अनेक उत्तम वक्ते, नेते, शासकीय अधिकारी, पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, एपीआई, पीएसआय, लेखक, गायक, कलाकार आणि गुणवान शिक्षक घडविले.
– शब्दांकन
ज्ञानदेव वरे
जि. प. शाळा, धनावडेवाडी, शेरताटी