पुणे – आपल्या मागील पिढ्यांनी केलेला संघर्ष जाणून घेणे गरजेचे आहे कारण तुम्हाला व तुमच्या पुढील पिढ्यांना ही संघर्षाची शिदोरी लढण्याचे बळ देईल, असे उद्गार ‘अर्जुनायन’ पुस्तकाचे लेखक अर्जून पवार यांनी काढले.
माध्यमिक शाळेतील कारकून ते कार्यालयीन अधीक्षक असा प्रवास करणारे नाशिक जिल्ह्यातील अर्जून पवार यांच्या ‘अर्जुनायन’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अर्जून पवार बोलत होते. यावेळी प्र. कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार तसेच सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते. अर्जून पवार यांनी नुकतीच वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली असून त्यांचा जीवनप्रवास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे.
याप्रसंगी बोलताना डॉ. नितीन करमळकर म्हणाले, अर्जून पवार यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामान्य घरातून येत आपल्या जिद्द व चिकाटीने त्यांनी त्यांचे असमान्यपन सिद्ध केले आहे.
डॉ. एन.एस.उमराणी म्हणाले, ‘अर्जुनायन’ मधील भाषा अत्यंत साधी व मनाला भावणारी आहे. अर्जून पवार यांच्या लिखाणातून कुटुंबविषयी ओढ, तळमळ दिसून येते आहे.
डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, दादांच्या या लेखनाने आम्ही आमच्या मुळापर्यंत जात आमचा कौटुंबिक संघर्ष समजू शकलो, पूर्वजांनी आमच्यासाठी घेतलेले अपार कष्ट जाणवून घेऊ शकलो. त्यांच्या सर्वांचेच ऋण कधी फेडता येणार नाही पण त्यांचे कष्ट वाया जाणार नाही हा शब्द मी त्यांना या निमित्ताने देईन.