जुन्नर – करोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी प्रशासनाने केवळ 200 जणांना परवानगी दिली असताना 1800 ते 2000 वऱ्हाडी मंडळी आल्याने मंगल कार्यालयाच्या मालकासह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यासह 7 जणांच्या विरोधात पोलीस अंमलदार अमोल शिंदे यांच्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य देवराम सखाराम लांडे, बाळू सखाराम लांडे (रा. केवाडी), एकनाथ सीताराम कोरडे (रा. माणकेश्वर), चैतन्य उल्हास मिंडे (रा. तांबे), सुधीर नामदेव घिगे (रा. दूधनोली, ता. मुरबाड), डीजेचालक क्षितिज सुरेश कडणे (रा. चांडोली, ता. आंबेगाव) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देवराम लांडे यांच्या दोन्ही मुलांचा विवाह महालक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय येथे पार पडला.
लग्न दिवसाच्या एक दिवस आधी हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी सोशल मीडियावर बोलताना लांडे यांनी विवाह समारंभासाठी 2000 लोक जमणार असल्याचा अंदाज सांगितला होता. त्यानंतर जुन्नर पोलिसांनी त्यांना नोटीसही बजावली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत.
लग्न समारंभात 200 नागरिकांना परवानगी दिलेली आहे, असे असतानाही जुन्नरमधील बारव ग्रामपंचायत हद्दीतील जुन्नर कुसूर रस्त्यावरील महालक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या लग्न समारंभात 1800 ते 2000 जण आल्याचे दिसून आले असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. करोना विषाणूंचा संसर्गबाधित रुग्ण आढळून येत आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव आहे, हे माहित असूनही तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेश असतानाही जमाव जमवून गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच जिल्हाधिकारी पुणे यांचा जमावबंदीचा आदेश असताना व कोणत्याही प्रकारे डीजे न लावण्याबाबत नोटीस देऊनही लांडे यांनी सदर ठिकाणी 500 ते 700 लोक जमा करून डीजे सिस्टीम विनापरवाना व मोठ्या आवाजात चालू ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत.
“कायद्यापुढे लहान मोठे कुणी नसून कायदा सर्वांसाठी समान आहे. सर्वांनी आदर्श कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.”
-विकास जाधव, पोलीस निरीक्षक जुन्नर