पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उद्या (दि. 30) शहरातील सर्व लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत. कोविशिल्ड लसीबरोबरच शहरातील आठ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.
महापालिकेकडील कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने रविवारी (दि. 29) लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. लसीचा साठा उपलब्ध झाल्याने सोमवारी (दि. 30) शहरातील 18 ते 44 वर्ष व 45 वर्षांवरील नागरिकांना 60 केंद्रावर कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. त्यापैकी 9 केंद्रांवर प्रत्येकी एक हजार लसीचे डोस देण्याची क्षमता आहे. तर उर्वरित केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध असणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 5 लाभार्थी हे ऑनलाईन स्लॉट बुकिंग केलेले तर 20 किऑस्क टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍपनुसार लस दिली जाणार आहे. या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
इतर आठ केंद्रावर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. या आठ केंद्रांवर प्रत्येकी दोनशे डोस देण्यात येणार आहे. सर्व केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता स्लॉट बुकींगसाठी ओपन होतील. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रावर गरोदर व स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील.