सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेचा अंतिम टप्पा तळकोकणात सुरु आहे. शिवसेना आणि राणे यांच्यातील शाब्दिक युद्धाने भाजपची जन आशीर्वाद यात्रा चांगलीच गाजली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हाणामारी केल्यांतर, त्याचे आता पडसाद कोकणातही दिसत आहे. आता राणेंची ही यात्रा देवगडमध्ये जात आहे. मात्र त्याआधी भाजपच्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच हे बॅनर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.
देवगड मांजरेकर नाक्यावर बॅनर लावले आहेत. या बॅनरवर “ते असताना नाही संपवू शकले, तर ते नसताना काय संपवणार? #दादागिरी”. अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.
नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा देवगडमध्ये आज येणार आहे. त्याआधीच हा फलक लावण्यात आला आहे. देवगडमध्ये सध्या हा फलक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. देवगड शिवसेना शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
याठिकाणी काही शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन उभे आहेत. साधारण 30 ते 40 शिवसैनिक उपस्थित आहे. जामसंडेची सभा झाल्यानंतर याच मार्गावरून नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा जाणार आहे.