पुणे – शहरात आतापर्यंत झालेले लसीकरण, करोनाच्या दोन लाटांमुळे आलेली सामूहिक प्रतिकारशक्तीमुळे शहरात करोनाबाधित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 50 ते 60 टक्क्याने घटले आहे. दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात हे प्रमाण 35 ते 39 टक्के होते.
मात्र, मागील दोन आठवड्यात हे प्रमाण 14 ते 17 टक्केच्या आसपास आहे. त्यामुळे, आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षणीय प्रमाणात कमी झाला असून शहरातील ऑक्सिजनची मागणीही 7 टक्केवर स्थिर आहे. दुसऱ्या लाटेत ही मागणी प्रतिदिन 45 टनांवर गेली होती. शहरात महापालिकेकडून 16 जानेवारी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार, पालिकेकडून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे.
त्यानुसार, महापालिकेकडून 32 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले होते, त्या अंतर्गत दिवसाला 1 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने तयार केले असले तरी प्रत्यक्षात आतापर्यंत पालिकेस शहरात दिवसाला जास्तीत जास्त 40 हजार नागरिकांचेच लसीकरण शक्य झाले आहे.
केंद्राकडून आवश्यक असलेला लस पुरवठा वेळेत होत नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. मात्र, त्यानंतरही पालिकेने जवळपास 28 लाख जणांचे लसीकरण केले असून त्यात, 21 लाख जणांचा पहिला डोस झालेला आहे. तर 7 लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. या लसीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेकडून 11 जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. तर, 9 ऑगस्टपासून शहरात रात्री आठपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, त्यानंतर आता दोन आठवडे झाले तरी रुग्णसंख्येचा आलेख स्थिरावलेला आहे. त्यामुळे, शहरात लसीकरणाचे परिणाम दिसू लागल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.
रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण घटले
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 29 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत शहरात 1457 जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील 218 जणांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. तर 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत शहरात 1502 जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील केवळ 254 जणांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. तर आजअखेर शहरात 2186 सक्रिय बाधित असून त्यातील 931 जणांवर शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरात करोना रुग्णांचा आलेख स्थिरावलेला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल आणि मे महिन्यात बाधितांपैकी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 35 ते 39 टक्के होते. हे प्रमाण आता 15 टक्केपर्यंत खाली आलेले आहे. लसीकरण तसेच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याने हे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.
– डॉ. संजीव वावरे, पालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख