पुणे- हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी 155 तोळे दागिने, परकीय चलन, चांदीच्या वस्तू, रोकड असा 88 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.
याबाबत विवेक चोरघडे (वय 47, रा. शेवाळवाडी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरघडे शेतकरी आहेत. त्यांचा हडपसर भागातील शेवाळेवाडी परिसरात प्रशस्त बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात मागील बाजूने मध्यरात्री शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील कपाट उचकटून 155 तोळे सोन्याचे दागिने, परकीय चलन, चाळीस हजारांची रोकड, चांदीच्या वस्तू असा 88 लाख 38 हजारांचा ऐवज लांबविला. दरम्यान, घराची पाहणी करत असताना शयनगृहातील कपाट उचकटून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चोरघडे यांनी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चोरघडे यांच्या बंगल्याचे नाव “बरकत’ असून बंगल्याच्या आवारात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून कॅमेरे बंद असल्याचे पोलिसांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे.