पंचायत समितीचे राजकारण पेटले : पोखरकरांच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेकडून व्हीप
राजगुरूनगर – खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावावर बुधवारी (दि. 18) पुन्हा मतदान होणार आहे. शिवसेनेच्या सदस्यांना अविश्वासाच्या विशेष सभेस हजर राहून ठरावाच्या विरुद्ध मतदान करावे, असा पक्षादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिले आहेत. यामुळे पंचायत समितीचे शिवसेनेचेसदस्य (पान 1 वरून)8 ठरावाच्या बाजूने जाणार की विरोधात जाणार या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या व्हीपच्या खेळीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील कोणत्या पक्षाची खेळी सरस ठरणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. पोखरकर यांच्यावरील अविश्वास दि. 31 मे रोजी विशेष सभेत शिवसेनेचे सहा सदस्य, एक सदस्य तथा उपसभापती भाजपचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार अशा 11 सदस्यांनी ठराव आणला होता.
राज्यात महाआघाडी आहे; मात्र खेड तालुक्यात या महाघाडीची बिघाडी होत सवतीचे राजकारण सुरू आहे. अविश्वास ठराव आणि त्यानंतर घडलेल्या महा राजकीय नाट्याने जिल्ह्यासह राज्यभर चर्चा झाली. अविश्वास ठरावाच्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार, शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दि. 27 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात निर्णय पारित करून खेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी दि.31 मे रोजी घेतलेल्या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेचे कामकाज रद्द केले आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा लावण्याचे आदेश दिले होते.
सदस्य काय निर्णय घेणार
एकीकडे पक्षाने व्हीप काढला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने शिवसेनेचे सभापती पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला म्हणून सदस्यत्व रद्द करण्याचे प्रस्ताव पाठवले असल्याने या सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पोखरकर अद्यापही अटकेत
शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंड करीत सभापती भगवान पोखरकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर सहलीवर गेलेल्या या सदस्यांमध्ये व पोखरकर यांच्या समर्थकांमध्ये पुण्याजवळ एका रिसॉर्टवर हाणामाऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. ते अजूनही अटकेत आहेत.
आढळराव-मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
एकंदरीत सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर होणार की बारगळणार? ठराव मंजूर झाला तर पुढील सभापती कोण होणार? खेडची मदार दिलीप मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.