काबुल – तालिबान्यांनी फक्त अफगाणिस्तानच्या राजकीय क्षेत्रावरच ताबा मिळवला नाही, तर देशातील सर्व क्रिकेट स्टेडियमवरही कब्जा केला आहे. त्यामुळे तेथील आघाडीचा क्रिकेटपटू राशिद खान चिंतेत आहे. द हंड्रेड लीगनिमित्ताने तो सध्या इंग्लंडमध्ये आहे.
मात्र आपल्या लेग स्पिनने भल्याभल्या फलंदाजांची झोप उडवणाऱ्या राशिदचीच सध्या झोप उडाली आहे. तालिबान्यांनी त्याच्या देशावर म्हणजे अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे.
त्यामुळे त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. याशिवाय तालिबानच्या लोकांनी राजकीय हस्तक्षेप करत तेथील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर ताबा मिळविला आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या टी -२० विश्व करंडक स्पर्धेमध्ये अफगाणिस्ताचे खेळाडू कसे सहभाग घेणार, आणि त्याआधी सराव कोठे करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याशिवाय इंग्लंडच्या द हंड्रेड लीगमध्ये राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब हे तिन्ही अफगाणिस्तानचे खेळाडू खेळत आहे. त्यानंतर त्यांना आयपीएलमध्ये खेळायचे आहे.
अफगाणिस्तानच्या ताज्या परिस्थितीाबाबत राशिदने त्याच्या मनाची स्थिती इन्स्टा स्टोरीद्वारे शेअर केली आहे. यावेळी त्याने डोळ्यातून पाणी येत असल्याच्या इमोजीसह आता झोपू शकत नाही, असंही लिहिलं आहे. तसेच देशात पुन्हा शांती आणि स्थैर्य यावं, यासाठी तो प्रार्थनाही करत आहे.
राशिद खानची स्टोरी
तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये दहशत
तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर संपूर्णपणे ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. राष्ट्रपतींसह इतर मोठे नेते आणि मुत्सद्दी लोक देश सोडून गेले आहेत.
राष्ट्रपती भवनापासून सर्वत्र तालिबानी लोकांचा कब्जा आहे. देशाची बिघडत चाललेली परिस्थिती पाहून दुःखी झालेल्या राशिदने याआधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील बड्या नेत्यांकडे मदतीचं आवाहन केलं होतं.