पुणे(प्रतिनिधी) – फिटनेस आणि पर्यावरणाचा संदेश देत पुणे ते मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया असा 170 किलोमीटर प्रवास करत येथील सायक्लोहोलिस्क सायलिंग ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
“गो ग्रीन’ आणि “हम फीट तो इंडिया फिट’ हा नारा देत 16 सायकलस्वरांनी 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता चऱ्होली येथील वाघेश्वर मंदिर येथून मुंबईकडे प्रवासाला सुरुवात केली. मुसळधार पाऊस, उलट वारे, निसरडा घाट रस्ता, अंधारी वाट यातून मार्ग काढ ते सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचले.
यामध्ये संजय कंकणवाडी, अॅड. सम्राट रावते, मनिष महाजन, दिव्यांग नेवे, नीलेश जोगी, अजित घुले, हरदेश दलसे, कुणाल करंजकर, डॉ. सचिन बाविसकर, दुष्यंत दुबे, विजय कुलकर्णी, शार्दूल देशमुख, विजय भरमगुंडे, संकेत पारखे व 16 वर्षाचे श्रीराम काटकर आणि मित महाजन सहाभगी झाले.
यासाठी सायकलिस्ट सचिन बोटे, रोहन कामत, मधुकर मोरे आणि ऍड. पवन पाटील यांनी टीमला मार्गदर्शन केले. लहान मुलांमध्ये अनावश्यक मोबाइल वापराला आळा घालून शारीरिक तंदरुस्तीची आवड निर्माण करू शकतो.
हे सायकलिंगमुळे होणे शक्य आहे. हे या राईडमध्ये सहभागी झालेल्या 16 वर्षीय दोन्ही युवकांनी दाखवून दिल्याचे अॅड. सम्राट रावते यांनी सांगितले. भविष्यात असेच सर्व वयोगटातील सायकलिस्ट सोबत घेऊन नवीन सायकलिंग उपक्रम राबविणार असल्याचे संजय कंकणवाडी यांनी सांगितले.