नवी दिल्ली – जागतीक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारातही शुक्रवारी सोन्याच्या दरात भरीव वाढ नोंदली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 256 रुपयांनी वाढून 46,698 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 662 रुपयांनी वाढून 66,111 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,808 डॉलर तर चांदीचा दर 25.33 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक बाजारातील घडामोडीप्रमाणे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली.
जागतिक पातळीवर करोनो रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. त्यामुळे जागतिक धातू बाजारात वातावरण अस्थिर आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर अस्थिर असल्याचे वातावरण आहे.
सध्या तुलनेने सोने आणि चांदीचे दर बरेच कमी आहे त्यामुळे दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करण्यासाठी सध्याची परिस्थिती चांगली समजली जाते. काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत गेले होते.