पुणे (संजय कडू) – सायबर गुन्हेगार सातत्याने नवीन पद्धत वापरून ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. सेक्सटॉर्शनचे प्रकार उघड असतानाच आता आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे लॅपटॉप हॅक करून ते डिकोड करण्यात येत आहेत. त्यानंतर खंडणीची मागणी करण्यात येत आहे. ही खंडणीही क्रिप्टो (आभासी चलन) करन्सीच्या माध्यमातून केली जाते.
अशा प्रकारचे काही गुन्हे नुकतेच दाखल झाले आहेत. एका आयटी कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला ई-मेलद्वारे एक लिंक पाठवण्यात आली होती. त्याने ती ओपन केली असता त्याच्या लॅपटॉपने प्रतिसाद देणे बंद केले होते. त्याच्या लॅपटॉपवर सायबर भामट्याने ताबा मिळवला होता. त्यातील सर्व डाटा सायबर भामट्याच्या हातात गेला होता.
हा महत्त्वाचा डाटा पुन्हा हवा असल्यास 20 लाख रुपयांच्या क्रिप्टो करन्सीची मागणी करण्यात आली होती. असाच प्रकार आणखी एकाच्या बाबतील घडला. त्याच्याकडेही 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या घटना जून आणि जूलै महिन्यात घडल्या आहेत. या दोन्ही घटनांत खंडणीची रक्कम दिली नसून त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले, दोन महिन्यांत अशा प्रकारच्या चार तक्रारी आल्या आहे. करोनामुळे आयटी कर्मचाऱ्यांचे “वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. ते असुरक्षित इंटरनेटचा जोड वापरत आहेत किंवा त्यांनी त्यांचा फायरवॉल अपडेट केलेला नाही. हॅकर्स त्यांची महत्त्वाची फाइल किंवा डाटाला टार्गेट करतात.
…असे मिळवले जाते लॅपटॉपवर नियंत्रण
ई-मेल ओपन करताच त्यातील सर्व डाटा हॅकर्स हॅक करतात. ते लॅपटॉपवर नियंत्रण मिळवतात. आपल्या कमांड लॅपटॉपकडून पाळल्या जात नाहीत. हॅकर डाटा रिलीज करण्यासाठी आभासी चलनातून खंडणीची मागणी करतात. पीडित व्यक्तीला फक्त हॅकर्सचे मेसेज येतात, तो स्वत:काही पाठवून शकत नाही.