बेकायदा बांधकाम; कारवाई स्थगित
पुणे, ता. 14 – पर्वती पायथ्या जवळील बेकायदा बांधलेली घरे पाडण्याची कारवाई काल कॉर्पोरेशनने सुरू केली होती. आज ती थांबविण्यात आली. उरलेल्या घरात लोक राहत आहेत शिवाय पावसाळा आहे म्हणून कारवाई स्थगित केली गेली असे कळते. आज सकाळी शिवसेनेचे सैनिक या वसाहतीत गेले होते. पण कारवाई थांबल्याने त्यांनी फक्त सभा घेतली.
पाकिस्तान आता “प्रजासत्ताक’ होणार
नवी दिल्ली – नवी घटना अमलात आली की पाकिस्तान 14-15 ऑगस्टच्या रात्री प्रजासत्ताक होईल. 6 ऑगस्टला सिनेटची बैठक होईल. त्यावेळी शपथ विधी होऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले जातील. 9 ऑगस्टला सिनेटची संयुक्त बैठक होऊन त्यात नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल.
कोणावरही उपासमारीचा प्रसंग येणार नाही
पुणे – दुष्काळी कामावरील मजुरांना रोजगारीत महाराष्ट्र शासनाने आजवर दिलेली 50 पैशांची वाढ आता बंद करण्यात आली आहे. 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना आता दुष्काळी कामावर रोजंदारी देता येणार नाही, असे राज्यमंत्री रा. ज. देवतळे यांनी जाहीर केले. शासनाने उपरोक्त निर्णय जरी घेतला असला तरी कोणत्याही कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार नाही अशी काळजी शासन घेईल असेही देवतळे यांनी जाहीर केले.
पिंपरी-चिंचवड भागात भाडेनियंत्रण कायदा लागू
पुणे – पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व विभागांना 21 जूनपासून भाडे नियंत्रण कायदा लागू करण्यात आल्याचे महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीर करण्यात आले आहे.